टॅगस्

, , , , , , , , , , , , , , , , ,

Image

(ह्यात सिनेमाची गोष्ट अजिबात सांगितलेली नाही; त्यामुळे कोणताही रहस्यभेद ह्यात नाही.)

भारतातल्या जातिव्यव्यस्थेबद्दल पुष्कळ बोललं, लिहिलं जातं. अनेकांशी बोलताना लक्षात येतं की एरवी उदारमतवादी वाटणारे लोकही जातीपातीविषयी बोलताना कधी कधी विखारी होतात. आधुनिक भारतात निम्नजातींना कशा अनेक संधी आहेत, त्यांची कशी प्रगती होते आहे वगैरे आकडेवारी एकीकडे दाखवली जाते; तर दुसरीकडे परंपरेनं सवर्ण मानलेल्या जातींमध्ये आरक्षणासारख्या धोरणांचे फायदे मिळावे म्हणून धडपड चालू दिसते. एकीकडे महाराष्ट्राला फुले-शाहू-आंबेडकरांचा वारसा आहे वगैरे म्हटलं जातं; तर दुसरीकडे खैरलांजी, जात पंचायतींसारख्या घटना अजूनही ‘पुरोगामी’ महाराष्ट्रात घडत असतात.

ह्या सगळ्या मतमतांतरांच्या आणि समांतर वास्तवांच्या गदारोळात दलित साहित्यानं महाराष्ट्रात पाय रोवला आणि जातीय वास्तवाचा दाहक प्रत्यय त्या साहित्यातून यायला लागला. मराठी साहित्यसृष्टी त्यानं हादरली. हे काही तरी वेगळंच आहे ह्याची जाणीव भारतीय साहित्यातही पसरली. पण साहित्य हे माध्यमच शिकल्या-सवरलेल्यांसाठीचं असल्यामुळे पूर्वीच्या मौखिक परंपरेतल्या लोकसाहित्यापेक्षा ह्या साहित्याला जनसामान्यांपर्यंत पोहोचायला काही मर्यादा पडतात. विसाव्या शतकातल्या भारतात लोकसंस्कृती ही लिखित साहित्यापेक्षा दृकश्राव्य माध्यमातून पटकन पोहोचणाऱ्या सिनेमातून अधिक दिसू लागली. पण सिनेमा माध्यमाला वेगळ्या मर्यादा होत्या. सिनेमा बनवणं हेच एक खर्चिक आणि सांघिक काम होतं. दलित कवी एखाद्या झोपडपट्टीत राहून, शेतात किंवा मुंबईच्या गिरण्यांमध्ये राबूनही सशक्त कविता लिहीत होते, पण सिनेमातून आपल्यातला विद्रोह व्यक्त करणं तितकं सोपं नव्हतं. भल्याभल्यांचे हात सिनेमे काढून पोळले होते. शिवाय, जो सिनेमा पैसा आणि लोकप्रियता कमावत होता तो दाहक वास्तवाशी फटकून होता.

पण ही परिस्थिती २१व्या शतकात हळूहळू बदलली. फिल्म फेस्टिव्हल्स आणि सोशल नेटवर्किंगमधून ‘शिप अॉफ थिसिअस’सारखा गंभीर आणि कमी खर्चात बनवलेला सिनेमा आता मर्यादित प्रमाणात लोकप्रियता मिळवू शकतो. स्वातंत्र्यानंतर ६०-६५ वर्षांनी का होईना, पण सर्वसामान्यांहूनही दीन परिस्थितीतून आलेल्या नागराज मंजुळेची ‘फॅंड्री’ १४ फेब्रुवारीला प्रदर्शित होईल. अनेक महोत्सवांतून पारितोषिकं आणि प्रेक्षकांच्या पसंतीची पाठीवर थाप ‘फॆंड्री’ला अगोदरच मिळालेली आहे. रसिकमान्यता आणि लोकमान्यता एकाच वेळी साधण्याची ही किमया काय आहे?

Image

‘लहान मुलांचं भावविश्व दाखवणारा सिनेमा’ असं म्हटलं की गोग्गोड ‘माजिद माजिदी’छापाचं कृतक् काही तरी पाहावं लागणार अशी भीती आताशा भेडसावते. अबोध वयातली प्रेमकथा हा फॅंड्रीतला एक घटक आहे. ती तशी गोग्गोड व्हायचा धोका निश्चित होता, पण नागराजनं तो टाळला आहे. ‘शाळा’, बी.पी., टी.पी. प्रभृतींपेक्षा इथल्या जब्याचं गाव अधिक वास्तवाच्या जवळ जाणारं असावं. स्वप्नाळू जब्या आणि त्याला पदोपदी जमिनीवर खेचणारं ते वास्तव ह्यामुळे ‘भावविश्व’ हा गुळगुळीत शब्द त्याला वापरू नये अशी इच्छा होते. किशोर कदमसारखा एखादा अपवाद सोडता ह्यात कसलेले नट नाहीत. नट नसलेल्या, पण सिनेमातल्यासारखंच वास्तव जगत असलेल्या आणि म्हणून पडद्यावर परिणामकारक ठरणाऱ्या नटांना घेऊन केलेली फॅंड्री ‘निओ-रिअलिझम’चं लेबल बाळगत व्हित्तोरिओ द सिकाच्या ‘बायसिकल थिफ’शी त्यामुळे अधिक जवळचं नातं सांगते. कितीही पिच्छा पुरवला तरी हाती न गवसणारं पाखरू आणि डुक्कर ही परस्परविरोधी प्रतीकं वापरून ती वास्तववादापलीकडेही जाते आणि जब्यासाठी काही अस्तित्ववादी प्रश्नही उपस्थित करते.

‘सामाजिक आशय दाखवणारा सिनेमा’ हे असंच घासून गुळगुळीत झालेलं आणखी एक लेबल. हे लेबल घ्यायचं, समाजवादी, उदारमतवादी वगैरे विचारांचे लेप चढवत चढवत चकचकीत आणि शहरी प्रेक्षकासाठी नेत्रसुखद सिनेमा करायचा आणि करिअर ‘बनवायची’ अशी रेडीमेड रेसिपीच पुरोगामी महाराष्ट्रात आहे. घाऊक बक्षिसघेऊ अशा ह्या सिनेमांच्या मदतीनं कुणाही सोम्यागोम्याला आपली करिअर उभी करता येते हे महाराष्ट्रात पूर्वीच सिद्ध झालेलं प्रमेय आहे. नागराजनं हा धोकासुध्दा टाळला आहे. तो प्रेक्षकाला कुरवाळत नाही, सिनेमाला घासूनपुसून गुळगुळीत करत नाही आणि (शेवटचे नाट्यमय प्रसंग वगळता) कथानकातला सामाजिक आशय मुद्दाम अधोरेखितही करत नाही. संवादांतून किंवा चर्चानाट्यातून पात्रं आपली वैचारिक, सामाजिक बैठक वगैरे उलगडत सुटतात असा चाकोरीबद्ध पलायनवादही तो पत्करत नाही. सिनेमातल्या पात्रांच्या आपापल्या गोष्टींमधून आणि एकमेकांबरोबरच्या वर्तनातून सामाजिक आशय सहज लक्षात येईल ह्याची काळजी मात्र तो घेतो. कथानकातल्या नाट्यमय चढउतारांद्वारे प्रेक्षकाला खिळवून ठेवण्याचं कसबही तो चांगल्या प्रकारे, आणि तरीही बटबटीत मेलोड्रामा टाळून वापरतो. सुरुवातीला काव्यात्म वाटणारं अवघड वयातल्या मुलाचं जग हळूहळू विदारक कसं होत जातं तेही उल्लेखनीय आहे.

Image

‘आत्मचरित्रात्मक’ हे आणखी एक लेबल. त्याचाही गुळगुळीत फॉर्म्युला होऊ शकतो. ‘फॅंड्री’ हे सिनेमाचं नाव किंवा जब्या, कचरू, पिराजी अशी पात्रं घेत आणि गावातल्या खऱ्याखुऱ्या वाटाव्यात अशा चेहऱ्यांच्या मदतीनं केलेल्या फॅंड्रीत आत्मकथा कुठे संपते आणि सिनेमा कुठे सुरू होतो ह्याचा फारसा विचार न करता नागराज एक जोरकस, सणसणीत गोष्ट सांगतो. (त्यातलं एक पात्र खुद्द नागराजनंच उभं केलंय, पण त्यात कसलाही, म्हणजे हिचकॉक किंवा गेलाबाजार सुभाष घईची वाट चोखाळत असल्यासारखा, आव नाही.) रखरखीत जातीय वास्तव मांडताना सिनेमातला निसर्ग गरजेहून जास्त नेत्रसुखद होणार नाही ह्याचीही काळजी घेतलेली आहे. गावातली गटारं, उच्छाद मांडणारी डुकरं आणि इतर बकालीसकटचं गाव ह्यात दिसतं.

एकंदरीत सांगायचं तर मोठ्या पडद्यावर आवर्जून पाहावा असा, ‘पर्सनल इज पॉलिटिकल’ म्हणणारा मराठी सिनेमा अनेक दिवसांनंतर आला आहे. तो जरूर पाहा.

पूर्वप्रकाशित – ऐसी अक्षरे