टॅगस्

,

‘मराठी ऐतिहासिक कादंबरी’ असं म्हटलं की काही ठराविक नावं समोर येतात. त्यांचा एक साचादेखील जवळपास ठरलेला असतो. एखादी ऐतिहासिक महत्त्वाची व्यक्ती किंवा घटना घ्यायची आणि अलंकृत (किंवा अगदी शब्दबंबाळ!) भाषेची खैरात करून त्या व्यक्ती/घटनेभोवती एक महिरप तयार करायची. मराठी मनाला पूज्य आणि अभिमानास्पद वाटतील अशा, म्हणजे मराठ्यांचं शौर्य वगैरे उदात्त गोष्टींची त्या कादंबरीत भलामण करायची. असं केलं म्हणजे मराठी लोक तिच्याविषयी भरभरून बोलतात. आपल्या इतिहासाला उज्ज्वल करणारी अशी मराठी पुस्तकं आजकाल प्रचंड खपतातसुद्धा, त्यामुळे मग अशा कादंबऱ्या (आणि त्यांच्या आवृत्त्यांवर आवृत्त्या) काढायला प्रकाशकदेखील उतावीळ असतात. त्याहून वेगळी वाट चोखाळणाऱ्या ‘अंताजीची बखर’ ह्या नंदा खरेलिखित ऐतिहासिक कादंबरीचं आता ह्या अशा वातावरणात जवळपास विस्मरण झालेलं दिसतं. ‘बखर अंतकाळाची’ ह्या नावानं तिचा दुसरा भाग (सीक्वेल) नुकताच प्रकाशित झाला. ह्या अंताजीची आणि गेली काही वर्षं अनुपलब्ध असणाऱ्या त्याच्या बखरीची त्या निमित्तानं पुन्हा एकदा आठवण झाली. तिचा थोडक्यात परिचय इथे करून दिला आहे.

कादंबरीबद्दल सर्वप्रथम लक्षात येणारी गोष्ट म्हणजे आपल्या नावाला अनुसरत ती एखाद्या बखरीच्या भाषेत लिहिलेली आहे. अंताजी खरे नावाचा कुणी एक माणूस पेशवेकाळात खराच होऊन गेला, आणि त्यानं लिहिलेली बखर त्याच्या वंशजांना जुन्या कागदपत्रांत सापडली, असं कल्पून हे पुस्तक लिहिलेलं आहे. लेखकाचं नाव अनंत खरे आणि बखरीचा लेखक हादेखील त्याच नावाचा त्याचा पूर्वज अशी रचना असल्यानं हे काही तितकंसं सरळसोट पुस्तक नाही याची जाणीव लगेच होते.

हळूहळू हेही लक्षात येऊ लागतं की बखरीचा लेखक अंताजी हा एक तल्लख आणि मजेशीर प्राणी आहे. तो चक्क गुप्तहेर आहे. शिवाय, तो बायकांच्या बाबतीत चांगलाच ‘रसिक’ आहे. आणि तरीही त्या बाबतीत त्याची काही तत्त्वं आहेत. म्हणजे, ज्यात परस्परसंमती असेल असेच शरीरसंबंध तो ठेवतो; उगीच कुणावर बळजबरी वगैरे नाही. बायकाही त्याला वश होतात. शिवाय अशा आनंददायी गोष्टींत व्यवहार करणं त्याला मान्य नाही. त्यामुळे जो आनंद घ्यायचा तो ‘उपभोग्य मालाची खरेदी-विक्री’ करून नाही तर अगदी राजीखुशीनं. अगदी गणिकासुद्धा काही मोल न घेता त्याला वश होते!

आता गुप्तहेर, स्त्रीजातीचा गुणग्राहक रसिक आणि त्याही अशा स्वखुशीनं त्याच्या गळ्यात पडतात म्हणजे अगदी ‘जेम्स बाँड’च आठवला असेल ना? पण हा अंताजी काही कुणी साहसी, शूरवीर आणि धीरोदात्त नायक अजिबात नाही बरं! उलट तो एका साध्या मीठविक्या ब्राह्मणाचा पोर आहे आणि चांगलाच कातडीबचाऊसुद्धा आहे. कुठेही गेला की याला चिंता म्हणजे आपला जीव कसा वाचेल याची! आणि तो जातो तरी कुठेकुठे आणि भेटतो तरी कुणाकुणाला म्हणाल तर अगदी पेशवाईत ‘नेम ड्रॉपिंग’ म्हणता येईल असे एकेक मोहोरे! त्यात पेशव्यांपासून थेट बंगालचा नबाब सिराजउद्दौला आणि ब्रिटिशांचा रॉबर्ट क्लाईव्हसुद्धा येतात. नागपूरकर भोसले जेव्हा बंगाल सर करायच्या इर्ष्येनं गेले तेव्हा हा अंताजी त्यांच्याबरोबर जातो. इतकंच नव्हे तर बरोबर कलकत्त्याच्या कुप्रसिद्ध ‘ब्लॅक होल’मध्ये तो अडकतो आणि प्लासीच्या लढाईत इंग्रज बाजूनं (‘लढतो’ असं म्हणता येत नाही, म्हणून आपला) ‘असतो’.

नागपूरकर भोसल्यांच्या बंगाल चढाईशी निगडित रचलेल्या अशा ह्या सगळ्या कल्पित गोष्टीला इतिहासाची भक्कम जोड आहे. जागोजागच्या तळटीपांमधून आणि अखेर दिलेल्या कालानुक्रमे घटना-यादीमधून लेखक आपल्याला त्याची जाणीव करून देतो. उपलब्ध साधनांमधून जो इतिहास ज्ञात आहे त्यातल्या फटींत त्यांनी अंताजीला अगदी बेमालूम बेतून ठेवलंय.

अशा फटींतून निसटत निसटत लोकांचं निरीक्षण करणं ही अंताजीची आवड म्हणता येईल. त्याच्या आजूबाजूला अक्षरश: इतिहास घडत असतो. अशा वेळी थोरामोठ्यांपासून सर्वसामान्य कसे वागतात, त्यांच्या आस्था काय असतात आणि त्यांच्या ह्या आस्था आणि वर्तनाचा आपल्या इतिहासाशी कसा संबंध लागतो, ह्यांविषयीची मार्मिक निरीक्षणं अंताजी त्या सगळ्या धबडग्यात करत राहतो आणि आपल्या बखरीत नोंदत राहतो. ही निरीक्षणं म्हणजे आपल्या इतिहासावरची आणि समाजावरची एक अभ्यासपूर्ण टिप्पणी आहे. बंगालात इतकी समृद्धी असून मराठे ती आपल्याकडे वळवून घेण्यात अपयशी का ठरले; शूर असून सिराजउद्दौला किंवा इतर तत्कालीन शासक ब्रिटिशांपुढे का टिकले नाहीत; फ्रेंच आणि ब्रिटिश ह्यांच्यात काय गुणात्मक फरक होते आणि अखेर भारतात ब्रिटिश साम्राज्य प्रस्थापित का झालं, ह्या आणि अशा अनेक गोष्टी अंताजी आपल्या परिप्रेक्ष्यातून वाचकाला दाखवतो. इतकंच नाही, तर अगदी जदुनाथ सरकार मराठ्यांचा इतिहास सांगताना उभं करतात ते चित्र आणि आपल्या मनात त्या इतिहासाविषयी असलेली धारणा यांचा तौलनिक अभ्यासही जाताजाता लेखक करून जातो.

असा सर्व पट उभा करत असतानाच अंताजी आपला भ्याड आणि कातडीबचाऊ पळपुटेपणा मोकळ्या मनानं मान्य करतो. आपलं आणि मराठी राज्यकर्त्यांचं कुठे काय चुकत गेलं हे त्याला त्यातून जाणवू लागतं. मराठेशाही आणि मराठी माणूस ह्यांच्या मूल्यमापनाची ही एक तऱ्हा आहे हे मग हळूहळू वाचकाच्या लक्षात येतं. स्त्री-पुरुष असमानता, धर्म-कर्मकांडांचा समाजावर असणारा पगडा आणि त्यातून अखेर मराठेशाहीची आणि भारताची झालेली दूरगामी हानीसुद्धा त्यात दिसते. म्हणजे निव्वळ ऐतिहासिक घटना आणि त्यांद्वारे इतिहासाचं मूल्यमापनच नाही, तर व्यक्तिगत घडामोडी ते व्यापक सामाजिक आशय असादेखील एक मोठा पट त्यात मांडला आहे.

असं म्हणता म्हणता हेदेखील जाणवू लागतं की कादंबरी निव्वळ ऐतिहासिक नसून तिच्यात एक समकालीन आशयसुद्धा दडलेला आहे. आज आपण ज्याला नव्वदच्या दशकातलं आर्थिक उदारीकरण म्हणतो त्याच्या आसपास, म्हणजे काहींच्या मते आपण अमेरिकेचे मांडलिक झालो त्या काळाच्या आसपास लिहिलेली ही कादंबरी आहे. (मांडलिकत्वाविषयीच्या ह्या विधानाच्या आधारासाठी अगदी विकीलीक्सद्वारा उघड झालेले प्रकारसुद्धा पुरावे म्हणून घेता यावेत!) परकीय प्रभावाच्या पुनरागमनाच्या त्या काळाची कादंबरीवर पडलेली सावली लक्षात येते.

अनेक बारकाव्यांनिशी आणि अनेक अंगांनी इतिहासाचा केलेला अभ्यास, तरीही कादंबरी रंजक, मसालेदार आणि उत्कंठापूर्ण ठेवण्याचा यशस्वी प्रयत्न, आपल्याविषयी केलेली गुणात्मक आणि कालातीत म्हणता येईल अशी टिप्पणी ह्यांमुळे खरं तर ही कादंबरी मराठी साहित्यात ऐतिहासिक महत्त्वाची वाटते. ती प्रकाशित झाली तेव्हा जाणकार मराठी वर्तुळांत तिचा बोलबाला झालाही, पण आता मात्र मराठी माणसाला तिचा विसर पडलेला दिसतो. ‘बखर अंतकाळाची’ ह्या पुढच्या भागाच्या प्रकाशनामुळे अाणि ‘अंताजीच्या बखरी’ची नवी अावृत्ती उपलब्ध झाल्यामुळे मराठी माणसाचा अंताजीशी परिचय होईल अशी आशा पुन्हा निर्माण झाली आहे.

पूर्वप्रकाशन – http://www.misalpav.com/node/17391 (मार्च २०११)

‘बखर अंतकाळाची’मधला एक उतारा इथे पहाता येईल. कादंबरीची एकूण शैली आणि आशय ह्याचा त्यातून अंदाज येईल.

अंताजीची बखर – लेखक: नंदा खरे; प्रकाशकः ग्रंथाली (पहिली अावृत्ती), मनोविकास प्रकाशन