टॅगस्

, , , , , , , ,

https://i0.wp.com/marathimovieworld.com/images/girish-kulkarni-in-pune52.jpg

डिटेक्टिव्हकथा ही साहित्यविधा म्हणून मराठीत नवी नाही. बाबुराव अर्नाळकर, गुरुनाथ नाईक, सुहास शिरवळकर अशा अनेक लेखकांनी मराठीत हा प्रकार लोकप्रिय केला. त्यांच्या लिखाणामागची परदेशी मुळं ही स्पष्ट होती. मात्र परदेशी डिटेक्टिव्हकथांशी तुलना केली, तर त्यांचे मराठी अवतार खुजे वाटत राहतात. अमेरिकेत डॅशिएल हॅमेटनं मंदीच्या काळातल्या आपल्या लिखाणात चांगल्या-वाइटाच्या रुढ कल्पनांना धक्के दिले. रेमंड चॅन्डलरनं आपल्या कथांत सामाजिक वास्तवाचं चित्रण केलं. यापूर्वीची डिटेक्टिव्हकथा ही मुख्यत: दोन गोष्टींवर भर देत असे – एक म्हणजे केलेला गुन्हा पचवता येत नाही, आणि दुसरं म्हणजे अखेरच्या रहस्यभेदानं निर्दोष व्यक्तीला न्याय मिळतो. शेरलॉक होम्स किंवा अगाथा ख्रिस्तीच्या प्वारोपेक्षा चॅन्डलरचे डिटेक्टिव्ह मातीच्या पायांचे होते. त्यांनी जुने फॉर्म्युले उलटेपालटे केले. फ्रान्समध्ये जॉर्ज सिमेनोंसारख्यांनी हे धडे गिरवत चक्क मानवी अस्तित्वविषयक प्रश्नांना ह्या लोकप्रिय विधेतून हात घातला. ‘ल मोंद’सारख्या उच्चभ्रू फ्रेंच वृत्तपत्राच्या विसाव्या शतकातल्या सर्वोत्कृष्ट पुस्तकांच्या यादीमध्ये चॅन्डलर, सिमेनों किंवा जेम्स हॅडली चेससारख्या लेखकांच्या पुस्तकांचा समावेश होतो, ह्यावरून जागतिक स्तरावर ह्या विधेचं साहित्यिक योगदान लक्षात यावं. मराठी डिटेक्टिव्हकथांत मात्र पाश्चात्य साहित्यातल्यासारखी नैतिक गुंतागुंत, सामाजिक-राजकीय वास्तवाचं चित्रण किंवा अस्तित्वविषयक प्रश्नांना हात घालणं आढळत नाही.

पाश्चात्य डिटेक्टिव्हकथांनी चित्रपटांनाही पुष्कळ खाद्य पुरवलं. बिली वाइल्डरचा ‘डबल इन्डेम्निटी’ सुप्रसिद्ध आहे. हम्फ्रे बोगार्टनं साकारलेले ‘बिग स्लीप’ किंवा ‘मॉल्टीज फाल्कन’मधले डिटेक्टिव्ह अजरामर आहेत. अनैतिक वाटणारे पण प्रेक्षकाची सहानुभूती खेचणारे नायक, धोकादायक वाटणारी पण नायकाची आणि प्रेक्षकाची अनुकंपा मिळवणारी व्हॅम्प आणि कथानकातल्या नैतिक तिढ्याला गडद करणारं काळं वातावरण असलेले ‘न्वार’ चित्रपट अशी एक वेगळी विधाच ह्या प्रकारच्या चित्रपटांनी निर्माण झाली. फ्रान्समध्ये क्लूझो, क्लोद शाब्रोल अशा अनेक दिग्दर्शकांनी ह्या प्रकारच्या कथानकांवर केलेले चित्रपट आज अभिजात गणले जातात. हिंदी चित्रपटांत राज खोसला (सी.आय.डी.) शक्ति सामंत (हावडा ब्रिज), गुरु दत्त (बाझी) यांच्या काही चित्रपटांत ही न्वार चित्रपटांची वैशिष्ट्यं दिसतात. मराठीत मात्र डिटेक्टिव्हकथांवर आधारित आणि अशी गुणवैशिष्ट्यं असणाऱ्या चित्रपटांची परंपरा निर्माण झालेली दिसत नाही. ह्या पार्श्वभूमीवर निखिल महाजन दिग्दर्शित ‘पुणे ५२’ ह्या ताज्या चित्रपटानं मराठीत काहीतरी अनोखं करून दाखवलं आहे असं म्हणता येईल.

(चित्रपटाचं कथासूत्र अनेक परीक्षणांमध्ये आलेलं आहे. त्यामुळे इथं ते वेगळं दिलेलं नाही, तर मांडलेल्या मुद्द्यांच्या अनुषंगानं गरजेपुरता त्याचा उल्लेख केला आहे.)

९०च्या दशकात पी.व्ही. नरसिंह रावांच्या सरकारनं अर्थमंत्री डॉ. मनमोहन सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय अर्थव्यवस्थेत आमूलाग्र बदल घडवले. त्याची फळं आजचा मध्यमवर्ग चाखतो आहे. भारताच्या स्वातंत्र्योत्तर इतिहासातला हा एक महत्त्वाचा कालखंड होता. अनेक गोष्टी ह्या काळात बदलू लागल्या. मध्यमवर्गाच्या सामाजिक-आर्थिक परिस्थितीतही त्या काळानं मोठे बदल घडवले. हे सगळं आपल्याला परिचित आहे. पण त्याकडे वेगळ्या नजरेनं पाहण्याचा प्रयत्न ‘पुणे ५२’ करतो.

अमर आपटे (गिरिश कुलकर्णी) हा खाजगी डिटेक्टिव्ह आपल्या कामात वाकबगार आहे, पण लौकिक आयुष्यात अयशस्वी आहे. त्याच्या बायकोनं (सोनाली कुलकर्णी) घरच्यांचा रोष पत्करून त्याच्याशी लग्न केलेलं आहे. बिलं थकवून थकवून ती कसाबसा संसार रेटते आहे. नवरा आपल्यावर प्रेम करतो; तो आपल्याशी प्रामाणिक आहे ह्याचा तिला रास्त अभिमान अाहे. पण ‘तुला सुखात ठेवता येत नसेल तर ह्या त्याच्या गुणांना काय चाटायचंय?’ ह्या अापल्या आईच्या (भारती आचरेकर) व्यवहारी प्रश्नानं तीही निरुत्तर होते. नवरा-बायकोत पैशावरून सतत चिडचिड होते. पैशासाठीची तिची भूणभूण अमरला वैताग आणते. अशा परिस्थितीत पैसे मिळवण्यासाठी तो एक काम हातात घेतो आणि आपल्या अशीलात (सई ताम्हणकर) गुरफटत जातो. अापलं नक्की काय होतंय, हे कळायच्या आत तो अनेक पातळ्यांवर अनैतिक होत जातो. मात्र त्याची ही नैतिक अधोगतीच त्याच्या आर्थिक उन्नतीची वाट ठरते.

हा गुंता प्रेक्षकाला अनेक पातळ्यांवर भंजाळून टाकणारा आहे. सई ताम्हणकरची व्यक्तिरेखा वरवर जे दाखवते आहे तशी वस्तुस्थिती नाही, हे प्रेक्षकाला आणि अमरलाही हळूहळू लक्षात येतं. तरीही अमर तिला जाब विचारत नाही; उलट तिच्यात गुंतत जातो. घरच्या कटकटी पाहता त्याचं हे वागणं स्वाभाविक वाटतं. पण त्यामुळे मराठी चित्रपटातल्या नायकाच्या रुढ प्रतिमेला अमर आपटेचं गुंतागुंतीचं व्यक्तिमत्व छेद देतं. आणि तरीही, म्हणजे बायकोशी प्रतारणा करत असूनही अमर प्रेक्षकाच्या नजरेतून उतरत नाही हे कथानकाचं सामर्थ्य म्हणता येईल. कोणत्याही मोहाच्या प्रसंगी नाही म्हणणं त्याला शक्य असतं, पण तो मोहाच्या गर्तेत अडकत जातो. आणि इथे कुठेतरी कथानकातलं सामाजिक भाष्य हळूहळू लक्षात येऊ लागतं.

घरात पैसा खेळू लागतो तशी बायको आणि सासूची वागणूक बदलत जाते. आर्थिक परिस्थितीत फरक पडतो तशी अमरला सामाजिक प्रतिष्ठाही मिळू लागते. पण हे सगळं कमावण्यासाठी त्याला आपल्यातल्या सत्वाशीच तडजोडी करायला लागलेल्या असतात. परस्त्रीबरोबर झोपून केलेल्या प्रतारणेपेक्षासुद्धा ही प्रतारणा जीवघेणी असते. आपल्या नैतिक अध:पतनाची जाणीव असूनही घरचे आपल्याला माफ करताहेत याचं कारण म्हणजे निव्वळ आपण घरात आणतो तो पैसा आहे; इतकंच नव्हे, तर नैतिक अधिष्ठान टिकवून परिस्थिती जैसे थे ठेवण्यात त्यांना रस नाही, ह्याची जाणीव अमरला हादरून टाकणारी आहे. वेगवेगळ्या प्रकारचे भ्रष्ट व्यवहार करून ज्या मध्यमवर्गानं आपल्या पोळीवर तूप वाढून घेतलं त्यांच्यापुढे अमर आपटेचा नैतिक तिढा एक आरसा ठेवतो. कथानकातलं रहस्य हे एकाच वेळी उत्कंठा वाढवत नेतं आणि हा तिढा हळूहळू अधोरेखित करत जातं. ह्या प्रकारची गुंतागुंतीची पटकथा ही अर्थात नैतिक उपदेशाचे धडे देणाऱ्या सरधोपट मराठी चित्रपटांपेक्षा वेगळी आहे आणि म्हणूनच विशेष दखलपात्र आहे. कथानकात पुढे काय घडेल याविषयीची उत्सुकता इथे प्रेक्षकाला खिळवून ठेवते आणि त्याच वेळी त्यामागच्या सामाजिक टीकेमध्ये त्याला अंतर्मुख करण्याची ताकद आहे. अनैतिक वागल्यामुळे इथे शिक्षा होत नाही, तर बक्षीस मिळतं. पण मनाची कुरतड काही थांबत नाही. पारंपरिक नैतिक मूल्यं आणि भौतिक समृद्धीचं आमिष यांच्यातला हा टोकदार आणि जीवघेणा संघर्ष चित्रपटाला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जातो.

खेदाची गोष्ट म्हणजे अनेक परीक्षणं वाचता हे लक्षात येतं की लोकांना चित्रपट नीटसा कळलेलाच नाही. उदाहरणार्थ, ‘लोकसत्ता’तल्या परीक्षणात असं म्हटलं आहे की अमरवर नेमकं कोण पाळत ठेवत असतं आणि कशासाठी, हे शेवटपर्यंत कळलेलं नाही. ‘अमर आपटेला ट्रॅप करणाऱ्या यंत्रणेचे संदर्भ उत्तरार्धात सापडत नाहीत’ असं ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये म्हटलेलं आहे. खरं तर कथानकाच्या रहस्यभेदातून ह्या गोष्टीचा खुलासा होतो, पण ते ह्या परीक्षणकर्त्यांना समजलेलं नाही असं दिसतं. (रहस्यभेद उघड करून रसभंग होईल म्हणून प्रत्यक्ष खुलासा देणं इथं टाळलं आहे, पण कुणाला हवं असलं तर व्यक्तिगत संवादात ते सांगता येईल)

मायबोलीच्या परीक्षणकर्त्याला दळवीकाकांच्या पात्राचं प्रयोजन समजलेलं नाही. खरं तर ही पटकथेतली एक अत्यंत महत्त्वाची आणि अनोखी व्यक्तिरेखा आहे.बदलत चाललेल्या जगाविषयी अमर आपटेला सजग करण्याचं काम हे पात्र करतं. अमरची व्यक्तिरेखा सभोवारच्या ह्या बदलणाऱ्या परिस्थितीची आपल्या व्यक्तिगत आयुष्याशी सांगड घालू शकत नाही ही अमरची खरी शोकांतिका आहे. दळवीकाका त्याला जे सांगत असतात त्यामुळे हे अधोरेखित होत जातं आणि शोकांतिका अधिक गहिरी होत जाते. शिवाय, दळवीकाकांनी रात्री चॅन्डलर वाचण्यासाठी घराबाहेर दिवा लावून घेणं हे ह्या पटकथेच्या पूर्वसुरींचा उल्लेख म्हणून येतं. त्यात एक गंमत आहे. चित्रपटाचा काळपट ‘लुक’देखील चॅन्डलरच्या कथानकांवर आधारित न्वार चित्रपटांना साजेसा आणि कथानकातलं गांभीर्य गडद करणारा आहे.

‘पटकथाकाराने पटकथेला नेमकं टोक दिलं नसल्यानं चित्रपट अर्धवट संपल्यासारखा वाटतो’ असंही ‘लोकसत्ता’त म्हटलेलं आहे. मायबोलीवर कथेला ओपन-एंडेड म्हटलेलं आहे. खरं तर आपल्या सर्व कृष्णकृत्यांची जाणीव करून दिल्यानंतरही बायकोला त्याचं काही विशेष वाटत नाही आहे, हे जेव्हा अमरच्या लक्षात येतं तेव्हा आपला सगळा जीवनसंघर्षच संपल्याचं त्याला जाणवतं. ज्या डोलाऱ्यावर आपलं चिमुकलं घरटं आपण उभारलं होतं, तोच किती पोकळ होता त्याची ही जाणीव आहे. ती खरं तर पाहणाऱ्याला आतूनबाहेरून हलवणारी आहे. प्रेक्षकाला सुन्न करण्याची ताकद त्यात आहे. वरवर पाहता चकचकीत समृद्धी पण खोलवर पाहता गडद ऱ्हास अशा एका भकास भविष्यातल्या प्रकाशाकडे नायक-नायिकेचा प्रवास सुरू झालेला आपल्याला दिसतो. गडद अंधारात काम करणाऱ्या अमरविषयी आपल्याला ज्या कारणानं अनुकंपा वाटते तेच नाहीसं झालेलं आहे. आता त्याचा प्रवास प्रकाशाकडे आहे, पण हा प्रकाश उबदार नाही तर रखरखीत आहे. अशा एका टोकावर नायकाला आणून चित्रपट संपतो. पण हा आशयच परीक्षणकर्त्यांपर्यंत पोहोचलेला नाही हे अशा प्रतिक्रियांवरून दिसून येतं.

मराठी (आणि एकंदर भारतीय) सिनेमानं अतिशय सरधोपट वाटा चोखाळत प्रेक्षकांचं फार मोठं नुकसान केलं आहे. त्यामुळे अनेक स्तरांवर काही म्हणू पाहणारी ‘पुणे ५२’सारखी पटकथा ही प्रेक्षकांना गोंधळून टाकते. मला स्वत:ला पटकथा चांगलीच बांधीव वाटली. ते कसं ते किंचित विस्तारानं पाहू –
चित्रपट सुरू होतो तेव्हा आपल्याला प्रमुख पात्रं (अमर आपटे आणि पत्नी) ही एका समस्येत अडकलेली दिसतात – ती समस्या कोणती? तर जगायला लागतो तेवढा पैसा कुठून आणायचा. चित्रपटाच्या अखेरीला ही समस्या सुटलेली आहे. ती नक्की कशी सुटते ह्याचा संबंध आर्थिक उदारीकरणाशी आहे. नव्वदच्या दशकाआधी जे अनेक सरकारी निर्बंध होते ते उठवले गेल्यानंतर मोठ्या प्रमाणात उद्योगधंदे वाढले. छोटे उद्योजक वाढले. त्याबरोबर खाजगी क्षेत्रांत मोठ्या प्रमाणात पैसा खेळू लागला आणि पैसे कमावण्याचे नवनवे कायदेशीर-बेकायदेशीर मार्ग उपलब्ध झाले. आतापर्यंत साधी राहणी उच्च विचारसरणी वगैरे मूल्यं पाळण्याचा दावा करणारा मध्यमवर्ग ह्या नव्या प्रलोभनांना कसा सामोरा गेला ह्यावरनं त्याची ही मूल्यं किती सखोल होती आणि किती प्रमाणात केवळ संधीच्या अभावामुळे पत्करलेली होती हे लक्षात आलं.

अमर आपटे, पत्नी आणि सासू ही पात्रं ह्या तिढ्याला दृग्गोचर करतात. हे अगदी छोट्याछोट्या प्रसंगांतून जाणवतं. ‘तुला खायला हवं का?’ ह्याचं उत्तर ‘नको’ देणारी, पण उत्तर देतादेताच बिस्किटं चापणारी सासू काही केवळ नर्मविनोद पखरवण्यासाठी योजलेली नाही. तिचं वागणंबोलणं आणि तिचं बेडौल शरीर तिची वखवख दाखवतं. नेहाचं आणि अमरचं बोलणं ती चोरून ऐकते तेव्हा ती अमरच्या बायकोकडे चुगल्या करत नाही; पण त्याच्या नाकर्तेपणाविषयी सतत घालूनपाडून बोलत राहते. ह्यावरून तिची जीवनदृष्टी दिसते. ह्याउलट ओढगस्तीत संसार रेटताना मेटाकुटीला आलेली बायको वखवखलेली नाही; पण संसारात थोडं सुख लाभावं ह्यासाठी केल्या थोड्या तडजोडी तर बिघडतं कुठं असा, एक प्रकारचा सर्वसामान्यांना मान्य होणारा दृष्टिकोन ती मांडते. अडचण ही अर्थात मनस्वी जगणाऱ्या अमरसारख्यांची होते.

ह्या पार्श्वभूमीवर नेहाची (सई ताम्हणकर) व्यक्तिरेखा ही समृद्धीत जगणारी असली, तरीही सुखी नाही. त्यामुळे ती मध्यमवर्गाला एक प्रकारे आपलं भविष्यच दाखवते आहे. आपल्या स्वभावात न बसणाऱ्या भलत्या नैतिक तडजोडी कराल, तर तुमचीही गत माझ्यासारखी होईल हे ती दाखवते आहे; तरीही तिनं अजून पूर्णत: स्वत्व गमावलेलं नाही. म्हणून अमरसारखा माणूस तिच्यातल्या ह्या मनस्वीपणात गुंतत जातो. एवढाच तिढा असता तर अमरला आपण बायकोशी प्रतारणा करतो आहोत ह्या जाणिवेतून येणारं अपराधीपण एवढीच समस्या राहिली असती. पण अडचण तिथे नाहीच.

मग कथानकातली खरी समस्या काय आहे? तर ती अशी, की कळतनकळत अमरसारखा माणूस आपलं स्वातंत्र्यच गमावून बसतो. तो एका कळसूत्री बाहुल्यासारखा होतो. ही व्यवस्थाच अशी जीवघेणी आहे, की ती तुम्हाला मनस्वी जगूच देत नाही. तुम्ही संपता तरी, किंवा तुम्ही जगण्यासाठी ‘स्व’शी इतक्या तडजोडी करता की तुम्ही तुमचे राहतच नाहीत. आसुसून प्रेम करता काय? मग ह्या व्यवस्थेपुढे तुम्ही कमजोर ठरालच, आणि मग तुम्ही संपलातच म्हणून समजा.

ही जाणीव अमरला चित्रपटाच्या अखेरीला होते. पण पटकथेतली गंमत अशी आहे की प्रेक्षकाला सुरुवातीपासूनच ह्याचा सुगावा लागत जावा. अमरच्या पाळतीवर सतत कुणीतरी असणं हा डिटेक्टिव्हकथेला साजेसा गूढ प्रकार आणि त्याचा होणारा रहस्यभेद हा कथेचा एक स्तर झाला. पण त्यातून हळूहळू हेदेखील स्पष्ट होत जातं की ह्या व्यवस्थेत माणूस स्वत:ला जितका स्वतंत्र समजत असतो तितका तो नसतोच. तो आपोआप त्या व्यवस्थेचा गुलाम कधी होत जातो, ते त्याचं त्यालाच कळत नाही. जेव्हा कळतं तेव्हा फार उशीर झालेला असतो. हीच त्याची, म्हणजे स्वत्व सांभाळू पाहणाऱ्या मनस्वी माणसाची शोकांतिका आहे. आणि पटकथेनं तो आलेख चांगल्या प्रकारे मांडला आहे. नक्की कशाला ‘नाही’ म्हणता तर अमर वाचता हे आपल्याला सांगणंच कठीण होऊन बसतं इतकी ती पटकथा नीट आणि हेतुपुरस्सर बांधलेली आहे. म्हणूनच त्यातल्या प्रमुख व्यक्तिरेखांत प्रेक्षक स्वत:ला पाहू शकतात आणि अंतर्मुख होऊ शकतात.

चित्रपट चालू असताना आणि संपल्यावर प्रेक्षकांच्या ज्या प्रतिक्रिया येत होत्या, त्या मात्र हताश करणाऱ्या होत्या. खुल्या आर्थिक धोरणांचे फायदे ज्या वर्गानं करून घेतले आणि ते करताना कमालीच्या नैतिक तडजोडीही ज्यांनी केल्या असा मध्यमवर्ग कोथरुडातल्या मल्टिप्लेक्समध्ये चित्रपट पाहायला आला होता. लोक गंभीर प्रसंगांना हसत होते. सिनेमागृहातून बाहेर पडता पडता मोबाईलवरून फेसबुकवर सिनेमा पाहिल्याचं स्टेटस कसं टाकलं हे आपल्यासोबत आलेल्या दोस्तांना सांगत होते. अशा प्रतिक्रियांवरून हे लक्षात आलं, की चंगळवादाचे फायदे उपसता उपसता हा मध्यमवर्ग आता इतका सुजीर आणि कोडगा झालाय, की चित्रपटात आपल्याचविषयी काहीतरी सखोल आणि गंभीर म्हटलं आहे, आणि आपल्याला अंतर्मुख करणं हा चित्रपटाचा हेतू आहे हेच त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही आहे. चित्रपटाचा विदीर्ण करणारा आशय ह्यामुळे अधिकच महत्त्वाचा वाटू लागतो. अनेक सरधोपट मराठी चित्रपटांची तोंडभरून स्तुती करणारा, पण सघन चित्रपटांपर्यंत पोहोचूच न शकणारा प्रेक्षक कधी तरी थोडं आत्मपरीक्षण करेल का, असा प्रश्न मात्र मनात शिल्लक राहतो.

इतर परीक्षणांचे संदर्भ –
http://www.maayboli.com/node/40365
http://www.loksatta.com/manoranja-news/pune-52one-abstract-painting-44993/
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/18082403.cms

पूर्वप्रकाशित – http://www.aisiakshare.com/node/1530