टॅगस्

, , , , , , , ,

चमकदार कथा लिहू शकणाऱ्या अनेकांची कादंबरी लिहिताना तारांबळ उडते. चित्रपटाच्या बाबतीतही असं होऊ शकतं. किंबहुना, सध्याच्या नव्या फळीत गणल्या जाणाऱ्या अनेकांच्या बाबतीत असं दिसतं की काही चमकदार कल्पना त्यांच्याकडे असतात; काही ते जगभरातल्या सिनेमातून उचलतात; पण सलग दीडदोन तासांचा सकस अनुभव देण्यात ते कमी पडतात. अशा वेळी चार दिग्दर्शक मिळून चार लघुचित्रपट करत आहेत आणि तेदेखील भारतीय सिनेमाची शंभर वर्षं साजरी करण्यासाठी हे कळलं तेव्हा थोडी आशा वाटली. कारण त्यातले किमान दोघं तरी वर दिलेल्या मर्यादांसकट काही चांगल्या क्षमता बाळगून आहेत असं मला अधूनमधून वाटत राहतं. अर्थात, काही गोष्टींत सिनेमा कमी पडणार ह्याची आधीपासून जाणीव होती. उदाहरणार्थ, बॉम्बे टॉकीज ह्या नावातूनच भारतीय सिनेमापेक्षा हे हिंदी सिनेमाबद्दल असणार ह्याचा अंदाज येत होता. म्हणजे दाक्षिणात्य सिनेमा कितीही लोकप्रिय असो, किंवा इतर भाषांतला सिनेमा हिंदीपेक्षा कितीही अधिक दर्जेदार असो, तो काही ह्या विषयात बसणार नाही, ही मर्यादा स्पष्ट होती. शिवाय, दिग्दर्शकांची निवड काहीशी दोन्ही दरडींवर पाय ठेवणारी होती – करण जोहर आणि झोया अख्तर हे मल्टिप्लेक्समधल्या शहरी लोकप्रिय हिंदी सिनेमाचे प्रतिनिधी, म्हणजे त्यांचा चित्रपटअंश पिटातल्या प्रेक्षकांच्या अपेक्षा सांभाळणारा काही नसणार हे स्पष्ट होतं. ह्याउलट अनुराग कश्यप किंवा दिबाकर बॅनर्जी तर फक्त तथाकथित चोखंदळ प्रेक्षकांसाठीच सिनेमे बनवणारे, म्हणजे त्यांच्याकडून शहरी मध्यमवर्गीय बहुसंख्यांनाही काही मिळेल अशी आशा बाळगण्यात फारसा अर्थ नाही. तर असे सगळे आडाखे मांडल्यावर आता प्रत्यक्ष सिनेमाविषयी –

हिंदी सिनेमाशी संबंधित कथा असणं हा जर ढोबळ मानानं चार गोष्टींना बांधणारा धागा होता असं मानलं तर त्यात हे चार चित्रपट कितपत यशस्वी होतात? आणि तो मुद्दा बाजूला ठेवला तर इतर निकषांनुसार ह्या चित्रपटांचं विश्लेषण कसं करता येईल?

करण जोहरच्या गोष्टीत हिंदी सिनेमाचा धागा सर्वात कमकुवत आहे. दोन व्यक्ती वरवर पाहता एकमेकांना अजिबात साजेशा नसताना जुन्या हिंदी चित्रपट संगीताची आवड त्यांच्यात काही अनुबंध निर्माण करू शकते; किंबहुना प्रत्यक्षात तसे अनुबंध निर्माण होतील न होतील, त्या संगीतात ती क्षमता असते एवढाच त्या गोष्टीचा हिंदी सिनेमाशी संबंध आहे. त्यात ह्या जुन्या संगीताऐवजी दुसरं काही असतं तरी कथेत फारसा फरक पडला नसता. नाही म्हणायला सिनेमात जी दोन गाणी वापरली जातात त्यांचं मूळ चित्रपटातल्या कथेशी जे नातं आहे तेच ह्या कथेत आहे असं सुचवणं हा एक किंचित रोचक निर्णय म्हणता येईल. इतके दिवस तेचतेच बेगडी, गुळगुळीत, थबथबीत सिनेमे बनवून आपण जी पापं केली ती जणू तीस मिनिटांत आपल्याला पुसायची आहेत असं दिग्दर्शकानं ठरवलेलं दिसतं. शिवाय, इतकी वर्षं त्याच्या तथाकथित समलैंगिकतेबद्दल जे जाहीर/छुपं बोललं जातं त्यालाही उत्तर देण्याचा प्रयत्न इथे जाणवतो. पण मुळात करण जोहरची अडचण ही दिसते की इतकी वर्षं ज्या शोभेच्या बाहुल्यांना त्यानं नटनट्या मानलं त्यापेक्षा वेगळ्या लोकांची, म्हणजे अभिनेत्यांची ह्या पटकथेला गरज आहे हेच त्याला कळलेलं नाही. दोन प्रमुख पुरुष व्यक्तिरेखांच्या भावनिक आलेखांतले चढउतार मांडण्यात त्यानं निवडलेले चिकणेचोपडे चेहेरे फारच कमी पडतात आणि कथानकात असेलनसेल ते थोडंफार गांभीर्य अत्यंत पोरकट रीतीनं सादर झाल्यामुळे हरवून जातं.

अनुराग कश्यपनं अमिताभ बच्चनच्या कल्टभोवती एक गंमतीशीर कथा रचण्याचा प्रयत्न केला आहे. पण कथेचा जीवच मुळात फार छोटा अाहे. त्यातल्या गंमतीशी सुसंगत रंग भरण्यासाठी खरं तर हरिशंकर परसाई किंवा श्रीलाल शुक्ल यांच्या विनोदाच्या जातकुळीचं काही तरी करता आलं असतं. इलाहाबादी पात्रांचा इरसालपणा वगैरेंमुळे मग गोष्ट उठावदार होऊ शकली असती. पण आपण कॉमेडी करतोय की काळजाला हात घालणारी भावनाप्रधान गोष्ट सांगतोय, ह्यात खुद्द दिग्दर्शकच गोंधळलेला दिसतो. त्यामुळे तीस मिनिटांतसुद्धा कथा इतकी भरकटते की ती कुठेच पोचत नाही. इतर तिघांच्या महानगरी कहाण्यांत ही इलाहाबादी कहाणी उठून दिसणं शक्य होतं, पण ते दिग्दर्शकाला गवसलेलं नाही.

झोया अख्तरनं एक प्रकारची सावध खेळी खेळली आहे. लहान मुलांना सिनेमाविषयी वाटणारं आकर्षण केंद्रस्थानी ठेवून तिनं एक माजिद माजिदी छापाची गोष्ट सांगितली आहे. (पाहा : ‘चिल्ड्रेन अॉफ हेवन‘प्रमाणे एकमेकांना सांभाळून घेणारे भाऊ-बहीण वगैरे). त्यात पुन्हा जेंडर आयडेंटिटीसारखा नाजुक विषय घेऊन उदारमतवादी लोकांच्या काळजाला हात घालायचा प्रयत्न केला आहे. पण तो प्रयत्न तोकडाच पडतो, कारण अनेक उदारमतवाद्यांनाही अस्वस्थ करू शकेल असा जेंडर आयडेंटिटीचा प्रश्न अखेर कौटुंबिक इराणी गोडमिट्ट पद्धतीनं सोडवून तिनं एक सोयीस्कर पलायनवाद स्वीकारला आहे. त्यात पुन्हा नृत्य शिकू पाहणारा मुलगा ही कल्पना ‘बिली एलियट‘वरून उचललेली आहे, तर उत्कर्षबिंदू ‘लिटल मिस सनशाईन‘शी साधर्म्य राखतो. म्हणजे ह्यात तसं ओरिजिनल काही नाही, तर तो एक हुशारीनं केलेला कॉपी-पेस्ट जॉब आहे. त्यामागे अर्थात काही चलाख हिशेबही असावेत – उदाहरणार्थ, इराणी सिनेमांची आतापावेतो घिसिपिटी झालेली शैली वापरून गोग्गोड कहाणी सांगितली की ती मल्टिप्लेक्समधल्या भारतीय नागरी प्रेक्षकांना भावेल; तर थर्ड वर्ल्डमधल्या जेंडर आयडेंटिटीच्या प्रॉब्लेमशी डील करणारी स्टोरी सांगितली की कान फेस्टिव्हलमधल्या सोशलिस्ट प्रेक्षकांना सिनेमावर टीका करणं अवघड होईल अशी ही खेळी असावी की काय, अशी शंका येते.

दिबाकर बॅनर्जीची गोष्ट अनेक अर्थानं महत्त्वाकांक्षी आहे. सत्यजित राय यांची कथा घेऊन त्यात त्यानं स्वत:च्या पदरच्या अनेक गोष्टी घातल्या असाव्यात असं दिसतं. त्यात एकीकडे अत्यंत सामान्य वकुबाच्या, रटाळ आणि खडतर आयुष्य जगणाऱ्या एका माणसात आणि त्याच्या कुटुंबात हिंदी सिनेमामुळे एक (तात्पुरतं का होईन, पण) चैतन्य कसं येतं ते आपल्याला दिसतं. तर दुसरीकडे नाटकासारखी कला, आणि सिनेमानं तिच्यावर केलेली कुरघोडी यावर हा सिनेमा जाताजाता काही भाष्य करतो. कोट्यवधी लोकांच्या आयुष्यात सिनेमा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरीत्या काय करतो हे ह्या गोष्टीत अनेक प्रकारे दिसतं. त्यात आपल्याला सिनेक्षेत्राशी संबंधित लोक दिसतात, आणि मायबाप प्रेक्षकही दिसतात. त्यात स्टार लोकांचं स्टारपण दिसतं, आणि एक्स्ट्रॉ किंवा शूटिंगच्या आजूबाजूची फुटकळ कामं करणारे लोक यांचं माणूसपणही दिसतं. नवाजुद्दिन सिद्दिकीचं मराठीपण मात्र पटण्यासारखं होत नाही. विशेषत: तुफानाला घर देण्याच्या प्रसंगात ते अधिकच खटकतं. अमराठी प्रेक्षकांना तर बहुधा त्याचा काही संदर्भच लागणार नाही. त्यापेक्षा सरळ हिंदी व्यक्तिरेखा दाखवल्या असत्या, तर बरं झालं असतं की काय, असं वाटत राहतं. कोणत्याच बाबतीत काही हाती न लागलेल्या गृहस्थाच्या घरचा वांझोटा पक्षी (इमू?), त्याची आजारी मुलगी, चाळीतल्या बायका अशा अनेक घटकांचा रोचक वापर करून घेण्यात पटकथा यशस्वी होते. दिलेल्या विषयाच्या व्यापकतेला तीस मिनिटांत स्पर्श करणं आणि ते करता करता एक रोचक गोष्ट सांगणं ह्या दोन्हींत हा चित्रपटअंश यशस्वी होतो.

भारतीय सिनेमाची शंभर वर्षं साजरी करण्यासाठी ह्या वर्षीच्या कान महोत्सवात भारत खास पाहुण्या देशाचं स्थान भूषवणार आहे, पण महोत्सवाच्या स्पर्धात्मक विभागात मात्र एकाही भारतीय चित्रपटाला स्थान मिळालेलं नाही. वेगवेगळ्या कारणांसाठी हिंदी सिनेमात आज जे यशस्वी मानले जातात, अशा लोकांनी केलेलं हे चित्रपटकडबोळं पाहता हे लक्षात येतं की असं स्थान न मिळणं हा काव्यगत न्यायच म्हणावा लागेल.

पूर्वप्रकाशन : http://www.aisiakshare.com/node/1784