टॅगस्

, , , ,

Four Lions - Poster

कोणतीही गोष्ट पवित्र न मानता कशाचीही यथेच्छ चेष्टा करण्यात ब्रिटिश लोक पारंगत आहेत. मग जिहादी दहशतवाद याला अपवाद कसा ठरेल? दहशतवाद्यांची आणि त्याला तोंड देणाऱ्या ब्रिटिशांचीही खिल्ली उडवणारा ‘फोर लायन्स’ हा ब्रिटिश चित्रपट Channel 4वर नुकताच ११ सप्टेंबरच्या दशकपूर्तीनिमित्त दाखवण्यात आला. असला नमुना चित्रपट अशा वेळी दाखवून ब्रिटिशांनी आपली विनोदबुद्धी आजही शाबूत आहे याचाच निर्वाळा दिला.

ब्रिटनमध्ये राहणारे चौघे मुस्लिम मित्र पाश्चिमात्य संस्कृतीविरोधातल्या जिहादमध्ये शहीद व्हायला निघतात तेव्हा काय काय होतं, असं चित्रपटाचं सूत्र थोडक्यात सांगता येईल. त्याचा विनोदी सूर पहिल्या पाच मिनिटांतच लक्षात येतो. शहीद झाल्यानंतर लोकांना आपली भूमिका समजावून सांगणारे जिहादी व्हिडिओ बनवण्याचा कार्यक्रम चालू आहे. पण जिहादीच्या बसण्याच्या पद्धतीविषयीच वाद चालू होतो. कॅमेरामन बॅरी एकीकडे जिहादीला सांगत असतो की तू पुरेसा परिणामकारक वाटत नाहीयेस. त्याच वेळी ‘लवकर आटप; माझ्या कॅमेराची बॅटरी संपत आल्ये’ असा धोशासुद्धा तो लावत असतो. मग आमच्या जिहादीचा मूड कसा बरं लागणार? त्यात त्याच्या हातातली बंदूक… आणखी सांगत नाही.

एकंदर वितंडवाद घालणं आणि ज्यातत्यात आपली (नसलेली) अक्कल पाजळणं यात सगळे पटाईत असतात. बॅरी गोरा आहे पण आता मुस्लिम झाला आहे. तो इस्लामचा ‘इंटलेक्चुअल’ चेहरा म्हणून सगळीकडे वाद-बीद घालत हिंडत असतो. अशा एका वादादरम्यान सगळ्या उदारमतवादी विचारवंतांना कसं निरुत्तर केलं जातं ते मुळातूनच पाहण्यासारखं आहे. बॅरीचं डोकं भन्नाट चालतं. गोऱ्यांना धडा शिकवण्यासाठी आत्मघातकी हल्ला करायचा बेत ठरतो. पण हल्ला नक्की कशावर करायचा (म्हणजे टारगेट काय असावं) याबद्दल जोरदार वाद होतात. तेव्हा ‘आपण एका मशिदीवरच हल्ला करूयात’ असं बॅरी इतरांना पटवायचा प्रयत्न करतो. त्याचं त्यामागचं लॉजिक आणि इतरांचे त्याविरोधातले आक्षेप दोन्ही भयंकर विनोदी आहेत. एकदा ओमार त्याला चिडून काय म्हणतो ते पाहा, मग बॅरी हे काय ‘रसायन’ आहे ते लक्षात येईल:

Barry, shut up, mate! ‘Cause I tell ya, your little brain cell might go off now and again, but if you hands even go to move, if you try to set up the Islamic State of Tinsley again, going to university lectures, opening your big mouth, buying some more silver nitrate from Amazon… I’m gonna rip your plugs out!

तुमचं माहीत नाही, पण Islamic State of Tinsley आणि silver nitrate from Amazon ऐकून मी गडाबडा लोळत होतो.

रसायन म्हटलं की फैसलची आठवण निघायलाच हवी. एकाच दुकानात अनेकदा जाऊन त्यानं बॉम्ब बनवण्यासाठी ब्लीच आणलेलं असतं. ते कसं हे इथे पाहा. शिवाय त्याची महान योजना म्हणजे इंग्लंडमधल्या कावळ्यांना आत्मघातकी हल्ल्यासाठी प्रशिक्षित करायचं! एका कावळ्याला “तिथे ‘सेक्स शॉप’ आहे. जा आणि तो उडव.” असं तो सांगतो तो प्रसंग म्हणजे कहर आहे.

आणि वाज… ‘I think I’m confused, but I’m not sure!’ म्हणणारा वाज म्हणजे एक बावळट पण गोड नमुना आहे. नमाज पढताना मदत व्हावी म्हणून त्याच्याकडे एक नमाज म्हणणारं टेडी बेअर असतं. ‘आपल्या हृदयाची साद ऐक आणि मेंदूचं ऐकू नकोस’ यावर त्याच्यात आणि ओमारमध्ये एक ठार प्रसंग घडतो. ओमार आणि वाज पाकिस्तानात प्रशिक्षणाला जातात तेव्हा दोघं मिळून एका ड्रोनचा खात्मा करायचा प्रयत्न करतात आणि मग काय होतं ते प्रत्यक्षातच पाहायला हवं.

इतरांच्या मूर्खपणावर ओमार नेहमी चिडतो आणि अशा वेळेला त्याचा ‘देशी’वाद जागा होतो. एरवी ब्रिटिश इंग्लिशमध्ये बोलणारा ओमार माय-बहिणींवरनं शिव्या देताना यथेच्छ उर्दू शिंपडतो. आपल्या माहितीच्या भें** वगैरेंच्या सुरनळ्या त्यात आहेतच, पण त्याच्या तोंडचे मोठे फटाके म्हणजे अगदी खास या सिनेमासाठी घडवलेलं अक्षर वाङ्मय आहे. नक्की कोणत्या प्राण्याचा कोणता अवयव कुणाच्या नक्की कुठे घुसतो हे लक्षात यायला थोडा वेळ लागतो, पण जेव्हा लक्षात येतं तेव्हा दुखणारा अवयव आपलं पोट हा असतो हे मात्र नक्की.

दहशतवाद्यांबरोबरच त्यांचा मुकाबला करणाऱ्या ब्रिटिशांचासुद्धा इथे खरपूस समाचार घेतला आहे. क्लायमॅक्सच्या प्रसंगात वेगवेगळ्या कॉमिकबुक पात्रांच्या किंवा प्राण्यांच्या वेशातले जिहादी लंडनमध्ये फिरत असतात. त्यांच्यातला कोण धोकादायक आहे हे ठरवताना कोणता प्राणी कसा दिसतो याविषयी ब्रिटिश पोलिसांत हैराण वाद होतात. हातात बॉम्ब बनवण्याचं सामान घेऊन जाणारे जिहादी हे वेगळ्या प्रकारचे ‘जॉग स्क्वॉट्स’ करत जात असतात असं वाटणारा ओमारचा मित्र, त्यांची हिप्पी, ढिली शेजारीण अशी गंमतीशीर पात्रं यात आहेत.

ब्रिटनमधले मुस्लिम हे एकाच वेळी अनेक अस्मितांशी झगडत असतात याची प्रचिती चित्रपट पाहताना अनेकदा येते. उदा: कारमधून जाताना एका पॉप गाण्याचं समूहगान करणारे इतर जिहादी आणि त्यांच्यावर चिडलेला गोरा बॅरी. किंवा ओमारच्या घरी आलेला त्याचा धर्मगुरू मित्र, ओमार आणि त्याची बायको यांच्यामधला प्रसंग तर फार बोलका आहे. जोवर एक स्त्री खोलीत आहे तोवर खोलीत पाय ठेवायला हा धर्मगुरू तयार नसतो. तुझं घर फार हिंसक आहे, असं ओमारला सुनावणारा हा माणूस त्याच प्रसंगात नंतर हिंसक होतो आणि वर त्या हिंसेचं समर्थनसुद्धा करतो. हे वाचून तसं वाटणार नाही, पण हा प्रसंग अत्यंत विनोदी पद्धतीनं मूलतत्त्ववाद्यांचा पर्दाफाश करतो. ‘हृदयाची साद ऐक आणि मेंदूचं ऐकू नकोस’ किंवा दुरुस्त केलेली कार पुन्हा बंद पडली यामागेदेखील ‘ज्यू हात’ शोधणं, अशा प्रसंगांत विनोद आहे, पण बुद्धिभेद भोळसट माणसाला अंतिमत: कसं फसवतो, हेही त्यातून दिसतं. (अर्थात, हे फक्त इस्लामलाच लागू होतं असं नाही. ज्यानं त्यानं आपल्या मगदुराप्रमाणे आपल्या परिस्थितीशी हे ताडून पाहावं.)

परदेशात राहून तिथं एकीकडे रुजावंसं वाटतं पण पाश्चिमात्य संस्कृतीतल्या मुक्ततेची भीती वाटते, अशा तिढ्यात सापडलेला समाज इथे आपल्याला दिसतो. विनोदाच्या माध्यमातून केलेली ही एक करुणार्द्र सामाजिक टीका आहे. ओमार जेव्हा आपल्या मुलाला लायन किंगची गोष्ट सांगत असतो तेव्हा आपल्या फजितीची गोष्ट त्यात तो नकळत घुसडतो आणि तरीही आपण कसे धीरोदात्त नायक होऊ शकतो हे त्यातून आपलं आपल्यालाच पटवू पाहतो तेव्हाचा त्याचा अभिनय पाहण्यासारखा आहे. दोन संस्कृतींत मध्येच अडकलेली ही माणसं विनोदी आहेत पण त्यांचं भोळसट बावळट रूप करुणसुद्धा आहे. त्यामुळे नंतरनंतर चित्रपट थोडा गंभीर होतो, पण किंचितच. (अगदी शेवटची शीर्षकं चालू झाली तरी बंद करू नका. शेवटपर्यंत करमणूक होईल.)

‘टाईम’ मासिकानं २०१० सालच्या सर्वोत्तम १० चित्रपटांमध्ये याचा समावेश केला होता. दिग्दर्शक क्रिस मॉरिसला २०११मध्ये ‘Outstanding Debut By A British Writer, Director Or Producer’ या श्रेणीत बाफ्टा पुरस्कार मिळाला. एकंदर, एकदा आवर्जून पाहा आणि खळखळून पोटभर हसा असा सल्ला मी देईन.

ट्रेलर इथे पाहा.
अधिक माहिती: http://www.imdb.com/title/tt1341167

पूर्वप्रकाशित – http://www.misalpav.com/node/19296

29/09/2011